खेड- मंदार आपटे :
खेड नगरपालिका हद्दीमधील खेड खोंडे भडगाव सिमे लगतच डांबरी रोड पूर्णतः खराब झाला असून अपघाताला आमंत्रणच देत आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा चालक विद्यार्थी व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो. या रस्त्यावर एक छोटीशी मोरी आहे. ती मोरीही खचली असून येथे मोठ्या प्रमाणात एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मोरीवरील रस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः निघून गेले आहे. त्यामुळे या रस्त्यावर फक्त खडी शिल्लक असून या खडीवरून दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढत आहे. खेड व भडगाव खोंडे सिमे लगतच ज्ञानदीप विद्यामंदिर हि शिक्षणसंस्था आहे. या संस्थेमध्ये येणारे विद्यार्थी रिक्षा चालक-मालक तसेच शाळेमध्ये सोडायला आलेले पालक यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
पावसाळ्यामध्ये या मोरीमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते, येथील रस्त्याच्या काही भागाचे डांबर निघून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यानमुळे महिन्यातून ४-५ वेळा अपघातही होतात . पावसाळ्यामध्ये दुचाकी पडणे हे नेहमीच होते. या रस्त्यावरून सकाळी ८ ते ९:३० च्या दम्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या रस्त्यावर सायकलस्वार , दुचाकी वरून मुलांना सोडायला येणाऱ्या महिला, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा यांना व तसेच खोंडा भडगाव येथील नागरिकांना खेड कडे येण्यासाठी हा रस्ता खरा तर सोईचा आहे.
नगर पालिकेने या रस्त्याची पावसाच्या आत डागडुजी करून हा रस्ता विद्यार्थ्यानसाठी व्यवस्थित करावा अशी माफक अपेक्षा येथील विद्यार्थी करीत आहेत. गेली अनेक दिवस हा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरून ज्ञानदीप शाळा, एम.बी.ए. कॉलेज, आय.सी.एस. कॉलेज अश्या मोठ्या शिक्षणसंस्था आहेत. खेड तालुक्यासह बाहेरून अनेक विद्यार्थी या संस्थांमध्ये शिकण्यासाठी येत आहेत.
अनेक लोक प्रतिनिधी संस्थांमध्ये स्थानिक गावामध्ये कार्यक्रमासाठी याच रोड वरून येजा करीत असतात. त्यांना या रस्त्याची झालेली दुरवस्था दिसत नाही का? या रस्त्यावर एखादा अपघात झाल्यावर, हि मोरी खचल्यावर, मोठी दुर्घटना घडल्यावर रस्ता सुधारणार का? संबंधित प्रशासन एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात होण्याची वाट पाहत आहे का? असे प्रश्न स्थानीक ग्रामस्थानसह शाळेमध्ये येणारे पालक उपस्थित करीत आहेत.
हे देखील पाहा : आपली रत्नागिरी फेसबुक ग्रुप तर्फे आंबये पाटीलवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप…