खेड (प्रतिनिधी):
चाप्टर केस मिटवून देतो असे सांगत त्याबदल्यात ३ हजार रुपयांची मागणी करत ती स्वीकारताना खेड तहसीलदार कार्यालयातील चंपलाल महाजन डेढवाल या महसूल सहाय्यकाला रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. यामुळे खेड महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार व त्यांचे सहकारी यांचे विरुद्ध तहसीलदार कार्यालय खेड येथे चाप्टर केस सुरु आहे. ती मिटवून देतो असे सांगून यातील खेड तहसीलदार कार्यालयातील लोकसेवक चंपलाल महाजन डेढवाल या महसूल सहाय्यकाने २८ डिसेंबर २०२३ रोजी ३ हजार रुपयांच्या लाच रक्कमेची मागणी केली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे संपर्क साधला होता. त्याप्रमाणे सापळा रचत चंपलाल महाजन डेढवाल याला रोख रक्कम ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकसेवक डेढवाल यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
या केलेल्या कारवाई मध्ये पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, पोहवा. संतोष कोळेकर, पोहवा. विशाल नलावडे, पो. ना. दीपक आंबेकर, पो.कॉ. हेमंत पवार, सापळा पर्यवेक्षण अधिकारी सुशांत चव्हाण, पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी यांचा सहभाग होता तर या कामी मार्गदर्शन अधिकारी सुनिल लोखंडे पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र,
अनिल घेरडीकर अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, सुधाकर सुराडकर अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकरणी अधिक तपास शहानवाज मुल्ला, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो
रत्नागिरी हे करत आहेत.
अधिक वाचा : खेड ज्ञानदीप विद्या मंदिर येथे किल्ला स्पर्धांचे आयोजन, अनेक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग…