खेड (मंदार आपटे) :
सध्याचे युग सोशल मीडियाचे आणि तंत्रज्ञानाचे आहे. सोशल मीडियाचा विघाताक आणि विधायक अशा दोन्ही पद्धतीने वापर करता येणारी लोक आहेत. मात्र या सोशल मीडियाचा अत्यंत कल्पकतेने कसा वापर करावा याचे उदाहरण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई स्थित आपली रत्नागिरी फेसबुक ग्रुप या ग्रुपच्या सदस्यांनी दाखवून दिले आहे.
केवळ वरील रत्नागिरी जिल्ह्यातील सदस्यांनी एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित केले आहेत. या ग्रुप तर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून खेड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श शाळा आंबये पाटीलवाडी शाळेमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, वह्या, कंपास पेटी, छत्री, चित्रकला वही, स्केच पेन असे संपूर्ण शैक्षणिक साहित्य या ग्रुप तर्फे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी आपली रत्नागिरी फेसबुक ग्रुपचे ग्रुप ॲडमिन अमित उतेकर, मार्गदर्शक मंगेश चव्हाण तसेच आंबये गावातील शाळेचे माजी विद्यार्थी अजित सपकाळ यांच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच चंद्रकांत पाष्टे, माजी सरपंच तुकाराम सकपाळ, पोलीस पाटील रवींद्र सकपाळ, आपली रत्नागिरी फेसबुक ग्रुप सदस्य यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सपकाळ तसेच सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, माता पालक, शिक्षक पालक संघाचे सदस्य, शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक मंगेश वायकर यांनी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानून आपली रत्नागिरी ग्रुपला आभार पत्र दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सुप्रिया सावर्डेकर यांनी केले.
हे देखील पहा: आय.सी.एस. महाविद्यालयाने राखली उत्तम निकालाची परंपरा