दापोली मतदारसंघात रामदास कदम यांची १० हजारही मते नाहीत : संजय कदम

खेड : दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी आज शुक्रवारी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर आपण राष्ट्रवादीला रामराम ठोकून उद्धव सेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले. 

कदम म्हणाले, शिंदे गटाचे नेते रामदास कदम गद्दार आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात  रामदास कदम यांचे कोणतेही अस्तित्व नाही. त्यांचे दापोली व गुहागर दोन्ही मतदारसंघात अस्तित्व नाही. रामदास कदम यांचा मुलगा दापोली  मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, संदीप राजपुरे अशा कुणबी समाजातील नेत्यांच्या पाठिंब्यामुळे निवडून आला आहे. दापोली मतदारसंघात रामदास कदम यांची १० हजार देखील मते नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल.

संजय कदम पुढे म्हणाले की, शिवसेना अडचणीत असताना कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे की, आपण शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.  मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेना प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेईन. माझी उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक झालेली नाही. या मतदार संघाच्या भवितव्याच्या दृष्टीने एक माजी आमदार म्हणून विचार करणे माझे कर्तव्य आहे. 

यावेळी बोलताना कदम यांनी मी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेल्यानंतर काम करताना प्रामाणिकपणे काम केले. राष्ट्रवादीने मला भरभरुन दिले असे म्हणत राष्ट्रवादीशी आपण पूर्ण फ़ारकत घेतली नसल्याचेही सूचक वक्तव्य  केले.

रामदास कदम दुटप्पी वागतात. दापोलीच्या सभेत गुहागरचा भावी आमदार विनय नातू असे सांगतात. तर खेडमधील सभेत  गुहागरचा भावी आमदार सहदेव बेटकर असेल असे म्हणतात; असा आरोप  त्यांनी यावेळी केला.

दापोली मतदार संघाला लागलेला ५० खोक्यांचा डाग मतदार नक्की पुसून टाकतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!